Pune Prime News Desk : मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एक व्यक्ती १५ वर्षांपूर्वी वयाच्या ३७ व्या वर्षी कामाच्या निमित्ताने घराच्या बाहेर पडला आणि तो नागपूरला गेला. मात्र नागपूरमध्ये गेल्यावर तो त्याच्या साथीदारांपासून वेगळा झाला. त्याच्या मित्रांनी त्याचा खूप शोध घेतला. मात्र तो सापडलाच नाही.
यानंतर गावातील त्याचे साथीदार गावी परत आले. घरच्यांनीही अनेक वर्षे त्याचा शोध घेतला, मात्र तो कोणालाच सापडला नाही. ब्रजलाल असं त्या व्यक्तीच नाव आहे. दरम्यान, कुटुंबीयांनी ब्रजलालला मृत घोषित करून त्याचा तेरावं केलं. आता मात्र तब्बल १५ वर्षांनंतर ब्रजलाल जिवंत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाला समजली. ब्रजलाल त्याच्या घरी परतला. यामुळे कुटुंबीयांना खूप आनंद झाला.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ब्रजलाल हा बालाघाट येथील नक्षलग्रस्त पोलीस चौकी पाथरी येथील लेहंगाकन्हार ग्रामपंचायत सोमटोला येथील रहिवासी आहे. १५ वर्षांपूर्वी तो आपल्या गावातील काही लोकांसह महाराष्ट्रातील नागपूर येथे मजूर म्हणून आला होता. तेथे काही दिवस काम केले आणि बेपत्ता झाले.
ब्रजलाल या राज्यात भरकटला
ब्रजलालला या परिसरातील जास्त माहिती नव्हती. त्यामुळे इतके दिवस तो केरळ, छत्तीसगड, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि इतर ठिकाणी फिरला. त्यानंतर तो झारखंडमधील जमशेदपूरला पोहोचला, तिथे तो आजारी अवस्थेत होता. जमशेदपूरच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत करून ब्रजलालच्या राहण्याची व्यवस्था केली.
ब्रजलाल गेल्या ८ महिन्यांपासून जमशेदपूरमध्ये राहत होता. आजारपणातून बरं झाल्यानंतर ब्रजलाल बोलू लागला तेव्हा त्याने त्याविषयची माहिती दिली. या माहितीनुसार सामाजिक कार्यकर्त्यांनी आदिवासी समाजातील लोकांशी संपर्क साधला. यावेळी ब्रजलाल हा बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती त्यांना मिळाली.