पुणे: राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी’ योजनेच्या अंमलबजावणीला आता खऱ्या अर्थाने वेग आला असून राज्यातील सुमारे 24 लाख 73 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. अनेकदा कर्जमाफी म्हटलं की फक्त ‘पीक कर्जा’चा विचार केला जातो, परंतु या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात पीक कर्जासोबतच शेतीसाठी घेतलेल्या मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जांचाही समावेश करण्यात आला आहे.

राज्यस्तरीय बँकर्स समितीचा (SLBC) सविस्तर अहवाल अंतिम टप्प्यात असून, लवकरच तो सरकारला सादर केला जाईल. ज्या शेतकऱ्यांची कर्ज खाती 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीत होती, त्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे.

राज्यात 1 कोटी 33 लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे 24 लाख 73 हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. पीक कर्जाच्या परतफेडीची मुदत 30 जून असते. त्याआधीच ही कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा करण्याचा सरकारचा मानस आहे. शेतकऱ्यांनी आपले आधार KYC पूर्ण करून ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रक्रियेत कोणताही तांत्रिक अडथळा येणार नाही.







