मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील फोडाफोडीचे सत्र अद्याप संपलेले नाही, उलट ते आता एका अत्यंत खालच्या आणि निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. आता ‘ऑपरेशन तुतारी’ चर्चेत आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रडारवर आता शरद पवारांचे खासदार असून, पडद्यामागे अत्यंत वेगाने हालचाली सुरू आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राज्याच्या राजकारणातील आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही सत्ताधारी गटांना जास्तीत जास्त खासदारांचे बळ हवे असल्यामुळे फोडाफोडीचे राजकारण करण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून राज्यात सत्तांतर घडवले होते. आता तोच ‘शिंदे पॅटर्न’ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर (SP) आजमावण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर या हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे, शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी केलेल्या एका सूचक विधानामुळे “विरोधकांच्या गोटातून काही मोठे मासे गळाला लागणार का?” या चर्चेला उधाण आले आहे.

शरद पवारांच्या गटातील काही खासदारांना विविध आमिषे आणि ऑफर्स देऊन आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर मान्य केले आहे.







