बंगळूर : राज्यसभेच्या १५ जागांसाठी आज (ता. २७) मतदान होणार आहे. तीन राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. या जागा उत्तर प्रदेश, हिमाचल आणि कर्नाटकातील आहेत. तीन राज्यांतील १५ जागांसाठी आज सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. सायंकाळीच निकाल लागण्याची अपेक्षा आहे. या निवडणुकीत भाजपला दोन असंतुष्ट आमदारांची चिंता आहे. भाजपचे असंतुष्ट आमदार एस. टी. सोमशेखर आणि शिवराम हेब्बार यांची काय चाल राहणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. तर धजदला (JDS) एका आमदाराच्या क्रॉस मतदानाची भीती वाढली आहे. त्यामुळे निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता आहे.
विरोधकांची धडधड वाढली
उत्तर प्रदेशमधील राज्यसभा निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. येथे भाजपने आठवा उमेदवार उभा करून विरोधकांची धडधड वाढवली आहे. यूपीप्रमाणेच हिमाचल आणि कर्नाटकातही उलथापालथ होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांचे निकाल आजच (ता. २७) लागणार आहेत.
अटीतटीची लढत
भाजपने माजी खासदार चौधरी तेजवीर सिंह, माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत, सुधांशू त्रिवेदी, साधना सिंह, नवीन जैन आणि संजय सेठ असे आठ उमेदवार उभे केले आहेत. तर समाजवादी पक्षाने जया बच्चन, रामजीलाल सुमन आणि आलोक रंजन यांना उमेदवारी दिली आहे.
कर्नाटकमध्ये रंगत
भाजप-जेडी (एस) युतीने आपला दुसरा उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांना समोर आणले, त्यानंतर कर्नाटकातील राज्यसभा निवडणुकीची रंगत वाढली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक उमेदवाराला चार प्रतिस्पर्धी असलेल्या परिस्थितीत विजयासाठी ४५ मते मिळवणे आवश्यक आहे.
उत्तर प्रदेशात चुरस
उत्तर प्रदेशात भाजपने आठ उमेदवार उभे केले आहेत तर, विरोधी समाजवादी पक्षाने राज्यसभेच्या दहा जागांसाठी तीन उमेदवार उभे केले आहेत. भाजपला सात जागा मिळवण्यासाठी पुरेसा पाठिंबा असल्याने आणि सपाला तीन जागा बिनविरोध झाल्यामुळे, भाजपने संजय सेठ यांना आठवा उमेदवार म्हणून उमेदवारी दिल्यामुळे एका जागेसाठी स्पर्धात्मक शर्यतीची अपेक्षा कायम आहे.
या राज्यांत झाली बिनविरोध निवडणूक
गुजरात, छत्तीसगड, हरियाणा, उत्तराखंड, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा राज्यातील 41 जागांवर चित्र स्पष्ट आहे. या राज्यांतील प्रत्येक जागेवर एकच उमेदवार उभा राहिला. अशा स्थितीत हे उमेदवार बिनविरोध निवडून आले.