Uttar Pradesh News : उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश सरकारने ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अंड्यांच्या विक्रीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता 1 एप्रिलपासून प्रत्येक अंड्यावर उत्पादन तारीख आणि मुदत समाप्तीची तारीख छापणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना अंडी किती ताजी आहेत आणि ती खाण्यास सुरक्षित आहेत का, हे सहज समजणार आहे.

सध्या बाजारात विकली जाणारी अंडी किती दिवसांची आहेत, याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम असतो. काही वेळा जुनी अंडी ताजी असल्याचे सांगून विकली जातात. या पार्श्वभूमीवर सरकारने हा नियम लागू केला आहे. या नव्या नियमानुसार, अंड्यांवर स्पष्टपणे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट नमूद करणे आवश्यक राहील. त्यामुळे ग्राहक स्वतः अंड्यांची गुणवत्ता तपासू शकतील.
तज्ज्ञांच्या मते, सामान्य तापमानात अंडी साधारण 2 आठवड्यांपर्यंत चांगली राहतात. जर ती 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात फ्रिजमध्ये ठेवली, तर ती सुमारे 5 आठवड्यांपर्यंत वापरता येऊ शकतात. त्यामुळे अंड्यांची योग्य साठवणूक करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तपासणीदरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्यांची अंडी जप्त केली जातील. ही अंडी नष्ट केली जाऊ शकतात किंवा ती मानवी सेवनासाठी अयोग्य असल्याचे घोषित केले जाईल.
राज्यात आग्रा आणि झाशी येथे मुख्य शीतगृहे उपलब्ध आहेत. अन्न सुरक्षा नियमांनुसार अंडी आणि भाज्या एकत्र ठेवण्यास मनाई आहे. सुविधा मर्यादित असल्या तरी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे अंड्यांच्या विक्रीत पारदर्शकता येईल आणि ग्राहकांचे आरोग्य अधिक सुरक्षित राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.







