Mumbai News: मुंबई : मुंबईत पोलीस दलात चालक म्हणून कार्यरत असलेल्या 32 वर्षीय तरुणाने सांताक्रुझ कलिना पोलीस प्रशिक्षण केंद्रात गळफास घेऊन आत्महत्या (Police suicide case) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भैयासाब व्हावळे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते मूळचे परभणी जिल्ह्यातील रहिवासी होते. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भैयासाब यांचे गेल्या दीड वर्षांपासून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या नात्याला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रेयसीच्या आई-वडिलांकडून वारंवार मानसिक त्रास दिला जात असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच प्रेयसीच्या वडिलांकडून धमक्या दिल्या जात असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. या सततच्या दबावामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

या घटनेमुळे एका पोलीस कर्मचाऱ्याला वैयक्तिक आयुष्यातील तणावाचा सामना करता आला नाही, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. प्रेयसीच्या आई-वडिलांकडून होत असलेल्या त्रासामुळे ते मानसिक तणावात होते, अशी माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून त्याआधारे प्रेयसीच्या आई-वडिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून मोबाईल चॅटिंग आणि कॉल रेकॉर्ड्सची पडताळणी केली जात आहे. या घटनेमुळे वैयक्तिक आयुष्यातील तणाव आणि मानसिक आरोग्याच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.







