वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे गेल्या गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या घटनेला पाच दिवस उलटूनही ते कुठेही दिसले नाहीत. त्यांच्या प्रकृतीबाबत बऱ्याच दिवसांपासून कोणतेही अपडेट जारी करण्यात आले नव्हते. दरम्यान, बायडेन यांनी सोशल मीडियावर एक संदेश जारी केला की, ते पुढील निवडणूक लढवणार नाही.
बायडेन यांच्या घोषणेनंतर त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, केवळ रिपब्लिकनच नाही, तर डेमोक्रॅट पक्षाशी संबंधित लोकांनाही बायडेन गंभीर आजारी असल्याची भीती वाटत आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, बायडेन यांची प्रकृती झपाट्याने खालावली आहे, त्यामुळे त्यांना लोकांसमोर आणले जात नाही.
रिपब्लिकन पक्षाशी संबंधित काही युझर असा दावा करत आहेत की, बायडेन यांना ओलीस ठेवण्यात आले आहे. एवढेच नाही तर एका विरोधी पक्षनेत्याने बायडेन यांच्या जिवंत असल्याचा पुरावाही मागितला आहे. तथापि, दरम्यान, व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, बायडेन याना कोविड-संबंधित लक्षणे यापुढे दिसत नाहीत. 25 जुलै रोजी ते देशाला संबोधित करणार आहेत.
दरम्यान 37 वर्षीय रिपब्लिकन नेत्या लॉरेन बोएबर्ट यांनी सोमवारी एक पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली. त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जिवंत असल्याचा पुरावा मागितला. बोएबर्टने लिहिले- बायडेन यांनी कॅमेऱ्यावर येऊन त्याच्या रिकव्हरीबद्दल बोलावे. मला वाटते की, आता ते निवडणूक लढवणार नाहीत, हे बायडेन यांनाही माहीत नसेल.
अँटी-बायडेन डाव्या विचारसरणीचे पत्रकार ग्लेन ग्रीनवाल्ड यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडियाद्वारे आपण निवडणूक लढवणार नाही, असे म्हटले हे अगदी विचित्र आहे. त्यांनी स्वतः टेलिव्हिजनवर यायला हवे होते किंवा प्रत्यक्ष समोर येऊन आपले मत मांडायला हवे होते.
ग्रीनवाल्ड यांनी लिहिले की, बायडेन यांच्याशी संबंधित अनेक चर्चा सोशल मीडियावर फिरत आहेत. त्या गोष्टी पसरवण्यावर माझा विश्वास नाही, पण अलीकडच्या काळात डेमोक्रॅटिक पक्षात जे घडले ते ऐतिहासिक आहे. अपेक्षित संख्येच्या प्रतिनिधींचा पाठिंबा मिळविलेल्या उमेदवाराने निवडणूक लढविण्यास नकार देण्याची ही पहिलीच वेळ आहे. अचानक सोशल मीडियावर ट्विट करून निवडणूक लढवण्यास नकार देणे आणि नंतर गायब होणे ही स्वतःमध्ये एक अनोखी गोष्ट आहे. त्यांनी स्वतः हा निर्णय घेतला असेल तर त्यांनी जनतेला याची माहिती द्यायला हवी होती.