दिल्ली : महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागेल असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. आज उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस असून अनेक नेत्यांनी ठाकरेंच्या भेटीसाठी हजेरी लावली आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तर काँग्रेस खासदार कल्याण काळे, याशिवाय समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादवांचे पुत्र आणि खासदार आदित्य यादवांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजीत कदम हे सुध्दा उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत. काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मंगळवारी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आज शरद पवार, शाहू महाराज आणि उद्धव ठाकरेंची भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर उद्या (गुरुवारी) संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे सोनिया गांधींची भेट घेणार आहेत.
दिग्विजय सिंह यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट..
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘आमचे आणि ठाकरेंचे जुने संबंध आहेत. ठाकरे आणि माझा जुना स्नेह आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो होतो’. तसेच, समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादवांचे पुत्र आणि खासदार आदित्य यादवांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आदित्य यादव यावेळी बोलताना म्हणाले की, आम्ही मुंबईत पण समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतली होती, आज उद्धव ठाकरे दिल्लीत आले होते, म्हणून शिष्टाचार म्हणून मी त्यांची भेट घेतली.
उद्धव ठाकरेंची शिवसेनादेखील मविआत मोठा भाऊ नाही
उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून यावेळी ठाकरेंच्या भेटीगाठीसाठी अनेकांची गर्दी बघयला मिळाली. यावेळी काही मराठी पत्रकारांशीही ठाकरे यांनी संवाद साधला. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीत कोणीही मोठा भाऊ नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेनादेखील मविआत मोठा भाऊ नाही. समसमान जागावाटपावर भर दिला जाणार आहे. जागावाटपावर अद्याप महाविकासआघाडीत कोणतीही चर्चा झालेली नाही. अदानीला टीडीआरला विरोधाच्या मुद्यावर नो कॉम्प्रोमाईज, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.