मुंबई: भारतीय निवडणूक आयोगाने भारतीय संविधानाच्या कलम 324 अंतर्गत प्रदत्त अधिकारांचा वापर करत उपराष्ट्रपती निवडणूक 2025 साठी दोन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ही निवडणूक येत्या 9 सप्टेंबर 2025 रोजी पार पडणार आहे.

या निवडणुकीसाठी सुशीलकुमार लोहानी, आयएएस (ओडिशा कॅडर – 1995), अतिरिक्त सचिव, पंचायती राज मंत्रालय, आणि डी. आनंदन, आयएएस (सिक्कीम कॅडर – 2000), अतिरिक्त सचिव, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), यांची नियुक्ती मुख्य निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

तसेच, नितीनकुमार शिवदास खाडे, आयएएस (आसाम-मेघालय कॅडर – 2004), संयुक्त सचिव, ग्रामीण विकास मंत्रालय (भूमी संसाधन विभाग), यांना राखीव यादीत स्थान देण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपराष्ट्रपती निवडणूक पारदर्शक, विश्वासार्ह आणि सुरळीत पार पडावी, यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.







