जमखंडी : जन्मदात्या आईने आपल्या चारही मुलांना विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी येथील बेनाळमधील डाव्या कालव्यात फेकून स्वतः ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत चारही मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर स्थानिकांनी महिलेला वाचवले आहे.
ही घटना सोमवारी (दि. १३) सकाळी घडली आहे. कौटुंबिक भांडणाचे कारण यामागे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तनू निंगराज बजंत्री (वय ५), रक्षा (३), हुसेन व हसन (दोघेही तेरा महिने) अशी मृतांची नावे आहेत. महिला भाग्या निंगराज बजंत्री ही वाचली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कोल्हार तालुक्यातील तिलगी येथील ती रहिवासी आहे. बेनाळ पुलावरून मुलांना कालव्यात फेकताना तेथील मच्छीमारांनी तिला पाहिले. काही क्षणातच तिनेही उडी घेतली. मच्छीमारांनी तत्काळ कालव्यात उडी घेऊन महिलेला वाचवले. संपत निगराज व त्यांच्या भावांमध्ये त्यांनी पत्नी भाग्याची समजूत काढून बंगळूरला जाऊन मजुरी करून राहण्याचे सांगितले होते.
भोगीच्या दिवशी नदीत स्नान आणि देवदर्शनाची परंपरा उत्तर कर्नाटकासह काही ठिकाणी आहे. त्यानुसार पती, पत्नी मुलांसह निंगराज मोटारसायकलवरून विजापूरकडे निघाला होता. पेट्रोल संपल्याने त्याने बेनाळ पुलाजवळ पत्नी व मुलांना थांबवले. तो पेट्रोल आणण्यासाठी गेल्यानंतर ही घटना घडली आहे.