नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने केलेल्या कुरापतींना भारताने ठोस उत्तर दिले आहे. लाहोरपासून रावळपिंडीपर्यंत आणि कराचीपासून पुन्हा लाहोरपर्यंत भारताच्या कारवायांचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. यासोबतच भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांचाही कणा मोडला आहे. माहितीनुसार, मागील चार दिवसांत भारताने 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
अमेरिकेच्या मध्यस्थीने शुक्रवारी हा संघर्ष थांबला आहे. त्यामुळे भारत आता पाकिस्तानशी थेट युद्ध न करता तीन असे निर्णय घेऊ शकतो, ज्यामुळे पाकिस्तानला पायावर आणण्यासाठी युद्धाची गरजही भासणार नाही.
भारताने घ्यायचे ‘ते’ तीन निर्णय…
1) बलुच लिबरेशन आर्मीला मदत: बलुचिस्तानातील बलुच लिबरेशन आर्मीने पाक सरकार आणि सैन्याच्या नाकी नऊ आणले आहेत. ते दशकभरापासून पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची मागणी करत आहेत आणि वेळोवेळी पाक सैन्यावर हल्ले करत आले आहेत. या संघर्षातही बलुच आर्मीने भारताच्या समर्थनाची घोषणा केली होती. भारताने फक्त बलुच लिबरेशन आर्मीला मदत केली तरी पाकिस्तानच्या हातून बलुचिस्तान निसटेल आणि पाकिस्तान पायावर येईल.
2) ‘एफएटीएफ’ची ग्रे लिस्ट: भारताने आपली मुत्सद्दीगिरी वापरून पाकिस्तानला FATF (Financial Action Task Force) च्या ग्रे लिस्टमध्ये टाकले पाहिजे, जेणेकरून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय आर्थिक मदत मिळणार नाही.
3) आयएमएफ कर्जावर निर्बंध: युद्धाच्या दरम्यान पाकिस्तानला ‘आयएमएफ’ कडून एक अब्ज डॉलर्सचा बेलआउट मिळाला आहे. भारताने तो रोखण्यासाठी मुत्सद्दीगिरी वापरली पाहिजे. हे पैसे न मिळाल्यास आधीच दिवाळखोर झालेल्या पाकिस्तानला त्याच्या दहशतवादी कारखान्याचे अधिक दिवस संचालन करता येणार नाही.
भारताकडून 100 दहशतवाद्यांचा खात्मा
भारताने 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि सुमारे 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानच्या अनेक सैन्यस्थळांवरही हल्ले केले आहेत.