सागर घरत
करमाळा: राज्य शासनाच्या पुरातत्त्व व संग्रहालय विभागाअंतर्गत करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्यात येत असून या कामासाठी २ कोटीचा निधी आमदार संजयमामा शिंदे यांनी सोलापूर जिल्हा नियोजन मंडळामधून मिळविला होता. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा या तालुक्यांबरोबरच उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम आदी भागावरती राजे रावरंभा निंबाळकर यांची सत्ता होती. करमाळ्यातील कमलादेवीचे मंदिर तसेच भुईकोट किल्ला याची बांधणी राजे जानोजी,रंभाजी (रावरंभा) निंबाळकर यांनी सतराव्या शतकात केली होती.सध्या किल्ल्याचा अनेक भाग ठिकाणी झिरझिर झालेला आहे. या कामासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे मुख्य दरवाजा, किल्ल्याचे बुरुज दुरुस्ती, तटबंदीचे काम, किल्ल्याबाहेरील परिसर सुशोभीकरण करणे सुरु आहे. हे काम ऑगस्ट २०२४ पासून हाती घेण्यात आले आहे.
शहराचा हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी या संपूर्ण किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी आणखी करोडो रुपयांची गरज असून तो निधी संजयमामा शिंदे यांनी राज्य सरकारकडून उपलब्ध करून द्यावा अशी शहरातील जाणकार, इतिहासप्रेमी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.