मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात ज्या केसचा सर्वाधिक उल्लेख झाला, त्या नबाम रेबिया प्रकरणाच्या निकालाचा फेरविचार सुप्रीम कोर्टात सुरु होणार आहे. उद्या गुरुवारी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात निर्देशांसाठी ठेवण्यात आलं आहे. यामध्ये 7 न्यायमूर्तींचं घटनापीठ या प्रकरणाचं कसं आणि कधीपासून नियमित कामकाज करणार हे कळणार आहे. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण निर्देशांसाठी कामकाजात समाविष्ट झालेलं आहे. नबाम रेबिया या खटल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार सुरू होती, या केसचा संदर्भ शिवसेनेतील फुटीच्या केसवेळी देण्यात आला होता. आता या नबाम रेबिया प्रकरणाची पुन्हा एकदा सुनावणी सुरू होत आहे.
काय आहे नाबाम राबिया केस?
2016 मध्ये सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय देत अरुणाचल प्रदेशमध्ये बरखास्त झालेलं मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या नेतृत्वातलं काँग्रेस सरकार पुन्हा बहाल करण्याचा आदेश दिला होता. तसेच सुप्रीम कोर्टाने गुवाहाटी हायकोर्टाचा 14 आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय रोखणारा निकाल कायम ठेवला होता. अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल ज्योती प्रसाद राजखोवा यांचा विधानसभा सत्र जानेवारी 2016 ऐवजी डिसेंबर 2015 मध्ये बोलावण्याचा निर्णयही अयोग्य ठरवला होता.