मुंबई: राज्यात सध्या सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून अंगाची लाहीलाही होत आहे. आज, 15 एप्रिल रोजी मुंबईसह राज्यातील 8 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून सोलापूर आणि सांगलीत उष्णतेच्या लाटेचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने आता अत्यंत कठोर पावले उचलली असून, दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात काम करण्यास संपूर्ण बंदी घातली आहे.

कामाच्या वेळा बदलल्या
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नवीन ‘मानक संचालन प्रक्रिया’ (SOP) जाहीर केली आहे. वाढत्या उष्माघाताच्या घटना रोखण्यासाठी आता बांधकाम क्षेत्र, औद्योगिक वसाहती आणि फेरीवाल्यांसाठी नवीन वेळापत्रक लागू असेल.
-
सकाळची वेळ: पहाटे 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत.
-
दुपारी सक्तीची विश्रांती: 12 ते 4 (सर्व बाहेरील कामे बंद).
-
संध्याकाळची वेळ: दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत.
पुण्यात तापमानात वाढ; 15 जिल्हे ‘अति-संवेदनशील’
धक्कादायक बाब म्हणजे, एकट्या पुणे शहरात गेल्या दीड महिन्यात तब्बल 770 रुग्णांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. खासगी रुग्णालयांची आकडेवारी गृहीत धरल्यास हा आकडा हजाराच्या पार असण्याची शक्यता आहे. सरकारने यवतमाल, वाशिम, लातूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, नागपुर, जळगाव, नंदुरबार, धुळे वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, नांदेड आणि भंडारा या जिल्हांचा समावेश आहे. जिल्ह्यांना ‘अति-संवेदनशील’ घोषित केले आहे.
प्रादेशिक हवामान अंदाज
-
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र: येथे पारा 40 ते 43 अंशांच्या दरम्यान असून पुढील 48 तास अत्यंत उष्णतेचे असतील.
-
कोकण आणि मुंबई: तापमान 32-36 अंश असले तरी हवेतील आर्द्रतेमुळे प्रचंड अस्वस्थता जाणवेल.
आरोग्य सल्ला
तहान लागलेली नसली तरीही भरपूर पाणी प्या. लिंबू सरबत किंवा ताकाचे सेवन करा. चक्कर येणे, मळमळणे किंवा तीव्र डोकेदुखी जाणवल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधा. हे वाढत्या शहरीकरणामुळे ओढवलेले संकट आहे. पुढील काही दिवस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.







