नवी दिल्ली: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीएम) नेते सीताराम येचुरी यांचे गुरुवारी निधन झाले. येचुरी दीर्घकाळ आजारी होते. येचुरी (७२) यांना दिल्ली एम्समध्ये कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले होते. त्यांना श्वसनमार्गाच्या तीव्र संसर्गाने ग्रासले होते. 19 ऑगस्ट रोजी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू होते.
सीताराम येचुरी यांचा जन्म 1952 मध्ये मद्रास (चेन्नई) येथे तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी हे आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळात अभियंता होते. आई कल्पकम येचुरी या सरकारी अधिकारी होत्या. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एमए केले होते. सीताराम येचुरी 1975 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले.
1975 मध्ये येचुरी जेएनयूमध्ये शिकत असताना आणीबाणीच्या काळात त्यांना अटक करण्यात आली होती. कॉलेजमधूनच ते राजकारणात आले. जेएनयू विद्यार्थी संघटनेचे ते तीन वेळा अध्यक्ष म्हणून निवडून आले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रक वाचून येचुरी प्रसिद्धीच्या झोतात आले होते.