आसाम : आसाममधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहार. आज पहाटे 4 वाजता तपास सुरू असताना पोलिस आरोपीला गुन्ह्याच्या ठिकाणी घेऊन जात असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करत अचानक तलावात उडी मारली. ज्यात आरोपी तफजुल इस्लामचा मृत्यू झाला आहे. २ तासांच्या बचाव मोहिमेनंतर आरोपीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
आसाम येथील नागाव जिल्ह्यातील धिंग परिसरात एका १४ वर्षीय मुलीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्कार प्रकरणात तिघांची नावे समोर येत आहे. यामध्ये तफाझुल इस्लाम (२४) या आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर भारतीय सुरक्षा संहिता आणि POSCO कायद्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या कृत्यात सहभागी असलेल्या अन्य दोन गुन्हेगारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
गँगरेपच्या आरोपीच्या मृत्यूबाबत एसपी स्वप्नील डेका यांनी सांगितले कि, आरोपीची चौकशी करून त्याला गुन्ह्याच्या ठिकाणी नेल्यानंतर त्याने आमच्या ताब्यातून सुटून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि तलावात उडी मारली. त्यानंतर तत्काळ एसडीआरएफला बोलवण्यात आले. शोध घेतल्यानंतर आरोपीचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेत एक पोलिस हवालदार जखमी झाला. याप्रकरणी आम्ही लवकरच इतर आरोपींनाही अटक करू.
अल्पवयीन मुलगी गुरुवारी संध्याकाळी शिकवणीवरून घरी परतत असताना धिंग परिसरात ही धक्कादायक घटना घडली. त्यादरम्यान वाटेत तिघांकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर रस्त्याच्या कडेला अल्पवयीन मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. त्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नागरिक आक्रमक..
दरम्यान, गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी करत समाजातील विविध स्तरातील लोक शुक्रवारी सकाळी रस्त्यावर उतरले. या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून विद्यार्थी संघटनेने बंदची हाक दिली. तसेच दोर्षीवर कठोर कारवाई करून महिला व मुलींच्या सुरक्षेची खात्री देण्याची मागणी विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी केली.
अल्पवयीन मुलीसोबत घडलेली ही घटना मानवतेविरुद्ध गुन्हा आहे. या घटनेमुळे आमच्या अंतरात्म्याला दुःख झाले गुन्हेगारांना शासन करु. मी आसाम पोलिसांच्या डीजीर्पीना घटनास्थळाचा दौरा करुन अशा राक्षसांविरोधात त्वरित कारवाई कण्याचे आदेश दिले आहेत,”
हिमंता बिस्वा सरमा, मुख्यमंत्री, आसाम