लातूर: देशभर गाजलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आता एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय (CBI) यंत्रणेने आपला मोर्चा आता पुराव्यांच्या शोधाकडे वळवला आहे. लातूर शहरातील जवळपास 50 रद्दी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची आता सीबीआयकडून कसून चौकशी केली जाणार आहे. परीक्षा संपल्यानंतर नीटचा पेपर आणि महत्त्वाच्या नोट्स रद्दीत विकल्या गेल्याची कबुली काही संशयितांनी दिली आहे. त्यामुळे रद्दीत नेमकी कोणती कागदपत्रे गेली आणि त्यात मुख्य पेपर होता का, याचा शोध आता घेतला जात आहे.
या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 4 डॉक्टरांची चौकशी केली असून त्यांच्याकडील संशयास्पद मोबाईल आणि इतर साहित्य जप्त केले आहे. नीटची परीक्षा संपल्यानंतर दोन डॉक्टरांनी महत्त्वाच्या नोट्स रद्दीत विकल्याचे मान्य केले आहे, तर आणखी 3 डॉक्टरांची नावे तपासात समोर आली आहेत.
या संपूर्ण प्रकरणाचे कनेक्शन आता पुणे, लातूर आणि थेट राजस्थानपर्यंत जोडले गेले असून सीबीआय सध्या पुरावे गोळा करत आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते तिचे इतर भाषेत भाषांतर करणे, छपाई आणि डिजिटल पद्धतीने ती पाठवणे, या संपूर्ण प्रवासातच कुठेतरी पेपर लीक झाल्याची शक्यता सीबीआयने वर्तवली आहे.
तपासादरम्यान अटक झालेल्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार हिने एक मोठा खुलासा केला आहे. एनटीए (NTA) पॅनेलमध्ये काम करणाऱ्या रसायनशास्त्र विषयाच्या एका महिला प्राध्यापिकेच्या सांगण्यावरूनच प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले, अशी कबुली तिने दिली. यामुळे आता या महिला तज्ज्ञाची भूमिका कमालीची संशयास्पद मानली जात असून सीबीआय त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.







