हैदराबाद: मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये मतमोजणी सुरू आहे. ट्रेंडनुसार तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. कर्नाटकानंतर तेलंगणा हे दक्षिणेतील दुसरे राज्य आहे, जिथे काँग्रेस स्वतःचे सरकार बनवताना दिसत आहे. निकालानंतर, सर्वात जास्त चर्चेची गोष्ट म्हणजे तेलंगणात काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण होणार?
तेलंगणात मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत बोलायचे झाले तर अनेक नेते दावेदार मानले जात आहेत. यामध्ये प्रदेश काँग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी, खासदार कॅप्टन एन उत्तमकुमार रेड्डी, कोमातीरेड्डी व्यंकट रेड्डी आणि मल्लू भट्टी विक्रमार्क यांसारख्या नावांचा समावेश आहे. याशिवाय मोहम्मद अझरुद्दीन विधानसभा निवडणूकही लढवत आहेत. मात्र, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या नावाचा सर्वाधिक विचार केला जात आहे.
तेलंगणातील विजयाचे सर्वाधिक श्रेय रेवंत रेड्डी यांना मिळत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदासाठी रेवंत रेड्डी यांची सर्वाधिक चर्चा आहे. रेवंत रेड्डी हे तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. रेड्डी हे 2019 मध्ये जिंकलेल्या तेलंगणातील काँग्रेसच्या तीन लोकसभा खासदारांपैकी एक आहेत. या निवडणुकीतही रेवंत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या विरोधात गजवेल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत रेवंत रेड्डी आघाडीवर
तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी, जेव्हा रेवंत रेड्डी कार्यकर्त्यांमध्ये पोहोचले तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ ‘सीएम-सीएम’च्या घोषणा देण्यात आल्या. तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रेवंत रेड्डी काँग्रेसचा चेहरा राहिले. प्रचारादरम्यान ते नेहमीच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत दिसत होते.
तेलंगणाची राज्याची निर्मिती २०१३ मध्ये झाली. त्यानंतरची ही तिसरी निवडणूक आहे. या निवडणुकीत केसीआर मुख्यमंत्री म्हणून हॅट्ट्रिक करण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. तेलंगणात काँग्रेसच्या विजयाने रेवंत रेड्डी मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. रेड्डी निवडणुकीपूर्वी दावा करत आहेत की, 119 जागा असलेल्या तेलंगणात काँग्रेसचे 80 पेक्षा जास्त आमदार असतील. रेवंत रेड्डी यांचा जन्म 1969 मध्ये अविभाजित आंध्र प्रदेशातील महबूबनगर येथे झाला.
अभाविपसोबत राजकारणाला सुरुवात
रेड्डी यांनी विद्यार्थी राजकारणाची सुरुवात अभाविपपासून केली होती. नंतर त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षात प्रवेश केला. 2009 मध्ये ते टीडीपीच्या तिकिटावर आंध्रमधील कोडंगलमधून आमदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये ते तेलंगणा विधानसभेत टीडीपीचे सभागृह नेते म्हणून निवडले गेले.
रेवंत रेड्डी यांनी 2017 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, 2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तथापि, काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मलकाजगिरीतून तिकीट दिले, ज्यामध्ये ते विजयी झाले. 2021 मध्ये काँग्रेसने त्यांना मोठी जबाबदारी दिली आणि प्रदेशाध्यक्ष केले.