नवी दिल्ली : रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्र सरकारमधील मंत्री रामदास आठवले यांनी लोकसभेच्या देशभरात 25 जागा लढवणार असल्याची घोषणा केली. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठींबा देणार आहे, तसेच एन.डी.ए.चा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणार असल्याच रामदास आठवलेंनी स्पष्ट केलं.
ते म्हणाले, देशभरात रिपब्लिकन पक्षाचे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशात संघटन वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात रिपब्लिकन पक्ष लोकसभेच्या 25 जागा लढवणार असल्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. नवी दिल्लीतील कॉन्स्टीटयुशन क्लब येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना रामदास आठवले यांनी ही माहिती दिली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) देशभरातील 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील कार्यकारणीच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा आज झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत रामदास आठवले यांनी घेतला. आगामी मार्च 2024 पर्यंत सर्व राज्यांच्या कार्यकारणींचा अहवाल आणि किमान 5 लाख क्रियाशील सदस्य बनविण्याचं उद्दीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश रामदास आठवले यांनी आज कार्यकर्त्यांना दिले आहेत.