संभाजी बबन गायके
सीतामातेला सोडविण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी वानरसेनेच्या साहाय्याने लंकेपर्यंत पोहोचणारा सेतू बांधला म्हणून त्या सेतूला रामसेतू म्हणतात. आधुनिक काळातील एका सीतेनेही असाच एक सेतू उभारलाय, त्याला सीता सेतू म्हणूयात का?
दोन तीन दिवसांपूर्वीची गोष्ट. केरळ राज्यातील वायनाड नावाच्या डोंगराळ भागातील काही गावे त्यांच्या पाठीशी असलेल्या डोंगरांनी आपल्या पोटात घेतली आणि नकाशातून ही सारी गावेच नाहीशी झाली.. शेकडो लोक मातीच्या खाली गाडले गेले ते कायमचे. पावसाचे प्रचंड थैमान सुरु होते. सकाळी ही बातमी इतरांना समजली. सुरालमाला गावाजवळच्या मुन्दाकाई खेड्याच्या आसपासची चार गावे नाहीशी झालेली होती. आणि मुख्य म्हणजे या गावांशी संपर्क करण्यासाठी असलेला नदीवरील जुना पूल नष्ट झाला होता.
या गावांतील बचावलेल्या नागरीकांना मदत पोहोचवण्यासाठी काहीतरी तातडीने करणे गरजेचे होते. या गावांच्या जवळ पोहोचण्यासाठी पुलाची उभारणी करायला पाहिजे होती. ज्या दिवशी ही दुर्घटना घडली आणि लष्कराला माहिती मिळाली त्याच दिवशी बंगळूरू येथील मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपने आपले सत्तर जवान आणि पुलासाठी अत्यावश्यक सारे साहित्य सुमारे २० गाड्यांमध्ये भरून रवाना केले. या तुकडीचे नेतृत्व दिले गेले होते.
या तुकडीतील एकमेव महिला अधिकारी मेजर सीता अशोकराव शेळके या शूर महिलेकडे. या सीता ‘माई’ ह्या अहमदनगर जिल्ह्यातील केवळ ६०० लोकसंख्या असलेल्या गाडीलगाव या गावात अशोक भिकाजी शेळके या वकिलाच्या पोटी जन्मलेल्या चार अपत्यांपैकी एक. लोणी येथील प्रवरा इंजीनियारींग कॉलेजमधून त्यांनी (मेकॅनिकल)अभियांत्रिकी मधील पदवी प्राप्त केली.
त्यांना अंगावर अभिमानाची, अधिकाराची आणि सन्मानाची वर्दी घालायची होती. म्हणून आधी त्यांनी आय.पी.एस. होण्यासाठी प्रयत्न केले. त्याच जोडीला भारतीय लष्करात दाखल होण्याचे प्रयत्न सुरूच होते. तिस-या प्रयत्नात त्या एस.एस.बी.परीक्षेत यशस्वी झाल्या आणि थेट गेल्या त्या चेन्नई मध्ये. ना प्रदेश ओळखीचा ना भाषा. परंतु सीतामाई डगमगल्या नाहीत. त्यांनी अत्यंत नेटाने कठीण लष्करी अभ्यासक्रम पूर्ण केला व मद्रास इंजीनियरिंग ग्रुप मध्ये अधिकारी झाल्या. २०१२ पासून त्या सेवेत असून मेजर पदावर पोहोचल्या आहेत.
मेजर सीता शेळके यांनी आपल्या जवानांसोबत सतत ३६ तास पावसात, चिखलात उभे राहून काम केले. आपले सारे शिक्षण, ज्ञान, लष्करी प्रशिक्षण पणाला लावले. जवानांना त्या थंबी म्हणजे भाऊ म्हणतात! त्या सर्व भावांना प्रोत्साहित करत केवळ १६ तासांमध्ये हा १९० फूट लांबीचा लोखंडी पूल बांधून घेतला. या कामाच्या वेळी प्रचंड पाउस सुरू होता. पुराचे पाणी वाढत होते. मेजर जनरल व्ही. टी. थॉमस हे प्रमुख अधिकारी होते. मेजर अनिश मोहन कष्ट घेत होते. प्रमुख सर्वत्र चिखल, पुराचे वाढते पाणी, बघ्यांची गर्दी आणि पूल लवकरात लवकर बांधण्याचा ताण.
सत्तर पैकी एकाही जवानाने तीन मिनिटांपेक्षा जास्त विश्रांती घेतली नाही, की आपले भिजलेले, चिखलाने माखलेले कपडे बदलण्यात वेळ घालवला नाही. जेवण, झोप हे त्यांच्या शब्दकोशातून त्यादिवशी गायब झाले होते. निसर्गाशी त्यांची लढाई सुरू होती. Indian army never gives up! १९० फूट लांबीचा, पुरेशा रुंदीचा, अवजड वाहनांचे वजन पेलू शकणारा मजबूत सेतू तयार झाला होता. मदतकार्य जोमाने सुरू होऊ शकले! मेजर सीता अशोकराव शेळके. महाराष्ट्र कन्या..तुम्हाला मानाचा मुजरा…! salute officer! जय महाराष्ट्र! जय हिंद! जय हिंद की सेना!