जयपूर: नुकत्याच झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाचा मोठा धक्का बसला असून भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवलं. मात्र, यानंतर भाजपने भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली. भजनलाल शर्मा यांचा शुक्रवारी शपथविधी पार पडला. शर्मा यांच्या शपथविधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत भाजपाचे अनेक वरीष्ठ नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. मात्र, या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांनी केलेल्या एका चुकीची सध्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भजनलाल शर्मा हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळेच भाजपाच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजस्थानमधील इतर अनेक दिग्गज नेत्यांना डावलून भजनलाल शर्मा यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले. त्यापाठोपाठ राजघराण्यातील दिया कुमारी व प्रेमचंद बैरवा यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. राज्यपाल कालराज मिश्रा यांनी या तिघांना शुक्रवारी शपथ दिली.
Modi ji ???????????????? pic.twitter.com/qhbS9vAHtS
— Azy (@AzyConTroll_) December 15, 2023
या शपथविधी सोहळ्यासाठी सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्यासपीठावर आगमन होताच समोर बसलेल्या आणि व्यासपीठावरील मान्यवरांनीही उभं राहून त्यांना अभिवादन केलं. त्यावेळी सूत्रसंचालन करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्याने मोदींची ओळख “मु्ख्यमंत्री नरेंद्र मोदी” अशी करून दिली. यामुळे काही काळ व्यासपीठावरील मान्यवरांबरोबरच समोर उपस्थित लोकांमध्येही चलबिचल झाली. ‘मुख्यमंत्री’ अशी ओळख होताच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही काही क्षण सूत्रसंचालकांकडे पाहात राहिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
LIVE : राजस्थान की नवनिर्वाचित सरकार का शपथ ग्रहण समारोह।#आपणो_अग्रणी_राजस्थान https://t.co/vcJ4wEuvst
— BJP Rajasthan (@BJP4Rajasthan) December 15, 2023
यासंदर्भातले व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. राजस्थान भाजपाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं. या व्हिडीओमध्ये हा प्रसंग दिसत आहे. खुद्द मोदींसह व्यासपीठावरील सर्व नेत्यांना ही चूक लक्षात आली. मात्र, त्यानंतर त्यावर फारशी चर्चा न होता पुढील कार्यक्रम नियोजित क्रमाने पार पडला!