नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांची मंगळवारी लोकपाल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष 27 मे 2022 रोजी निवृत्त झाल्यानंतर लोकपालचे नियमित अध्यक्षपद रिक्त होते.
लोकपालचे न्यायिक सदस्य न्यायमूर्ती प्रदीप कुमार मोहंती कार्यवाह अध्यक्षाची भूमिका बजावत होते. राष्ट्रपती भवनातून प्रसिद्ध झालेल्या पत्रकानुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांची लोकपालचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती खानविलकर जुलै 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले.
निवृत्त न्यायाधीश लिंगप्पा नारायण स्वामी, संजय यादव आणि ऋतुराज अवस्थी यांची लोकपालचे न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुशील चंद्रा, पंकज कुमार आणि अजय तिर्की यांची लोकपालचे गैर-न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्या पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून लागू होतील. लोकपालचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या शिफारशींच्या आधारे राष्ट्रपती करतात. लोकपालमध्ये एका अध्यक्षाव्यतिरिक्त चार न्यायिक आणि गैर-न्यायिक सदस्य असू शकतात.