दिल्ली: दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर मागील २१ दिवसांपासून सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाने आज एका नाट्यमय आणि गंभीर वळण घेतले आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी, विशेषतः शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी वांगचुक हे अडून बसले होते. मात्र, आज त्यांची शारीरिक स्थिती खालावल्याचे निमित्त साधून दिल्ली पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली. मोठ्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचलेल्या प्रशासनाने उपोषणकर्त्यांना तिथून हलवले आणि सोनम वांगचुक यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

या कारवाईमुळे परिसरात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आपल्या नेत्याला पोलीस ताब्यात घेत असल्याचे पाहून तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. या दरम्यान पोलीस आणि आंदोलक यांच्यात मोठा वाद झाला असून, पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप केला जात आहे. वांगचुक यांनी रुग्णालयात नेले गेले तरीही, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा ठाम पवित्रा त्यांनी कायम ठेवला आहे.

‘क्रॉक्रोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावरून माहिती देताना सांगितले की, वांगचुक यांना जबरदस्तीने उचलले जात आहे आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीमार केला गेला आहे.

सध्या जंतर-मंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात असून वातावरण तणावपूर्ण आहे. आंदोलकांना हटवूनही या प्रकरणातील तणाव निवळलेला नाही. परंतु, २१ व्या दिवशी झालेल्या या प्रकारामुळे सोनम वांगचुक यांचे हे आंदोलन आगामी काळात कोणते वळण घेणार आणि विद्यार्थी संघटना कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.







