नवी दिल्ली : नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ आज घेणार आहेत. मोदींची ही हॅटट्रिक असून हा शपथविधी भव्य व्हावा यासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. आज 9 जून रोजी सायंकाळी 6 वाजता शपथविधी सोहळा संपन्न होणार असून यामध्ये दिग्गज नेत्यांसह काही महत्त्वाच्या लोकांचीही हजेरी लागणार असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवारी राष्ट्रपती भवनात आठ हजार पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी दिल्ली पोलिसांचे सुमारे 1100 वाहतूक कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या 5 तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर्स देखील समारंभात राष्ट्रपती भवनाचे संरक्षण करतील.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, वाहतूक पोलिस उपायुक्त (डीसीपी) प्रशांत गौतम यांनी सांगितले की, सुमारे 1100 वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांना सर्व सूचनांची माहिती देण्यात आली आहे, आम्ही सर्वांनी मिळून तालीम केली आहे. वाहतुकीच्या हालचालींबाबत सर्वसामान्य नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी येणारे परदेशी प्रतिनिधी आणि राष्ट्राध्यक्षांसाठी कडेकोट सुरक्षा आणि योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. स्वतंत्र मार्गांची व्यवस्था करण्यात आली असून नियंत्रण क्षेत्रही तयार करण्यात आले आहे.
दरम्यान, शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनाने काही पाऊले उचलली आहेत. यामध्ये 9 जूनपर्यंत राष्ट्रपती भवन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद राहणार आहे. शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रपती भवन खुले केले जाणार आहे. दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 9 जून रोजी या रस्त्यांवरील वाहतूक दुपारी 2:00 ते रात्री 11:00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या रस्त्यांवरुन फक्त पादचाऱ्यांनाच जाण्याची परवानगी असेल.