चेन्नई : मध्य प्रदेशमध्ये 21 लहान मुलांच्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरप कंपनीचे मालक जी. रंगनाथन यांना चेन्नई येथून अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील सात सदस्यीय पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई आहे. हे विषारी कफ सिरप ‘स्रेसन फार्मास्युटिकल्स’ या कंपनीने तयार केलं होते.

कोण आहेत जी. रंगनाथन?
जी. रंगनाथन (वय 73) हे ‘स्रेसन फार्मास्युटिकल्स’ या कंपनीचे मालक आहेत. ही कपंनी ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरप बनवते. रंगनाथन यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमधून फार्मसीचे शिक्षण घेतले असून, त्यांना या क्षेत्रातील चार दशकांहून अधिक अनुभव आहे.
व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात (1980 च्या दशकात) त्यांनी ‘प्रोनीट’ नावाचे एक पौष्टिक सिरप तयार केले होते, जे चेन्नईमध्ये खूप लोकप्रिय झाले होते. गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी फायदेशीर असल्याचा दावा केल्याने बालरोगतज्ञांकडूनही त्याची शिफारस केली जात होती. मात्र, सरकारी परवानगी आवश्यक असल्याचा आक्षेप राज्य औषध नियंत्रण विभागाने घेतल्यावर त्यांनी आवश्यक परवानग्या मिळवून व्यवसाय पुढे चालू ठेवला. कालांतराने त्यांनी लहान उत्पादन युनिट्स उभी केली आणि ते ‘स्रेसन फार्मास्युटिकल्स’चे प्रमुख बनले.
हीच कंपनी ‘कोल्ड्रिफ’ कफ तयार करते. त्यांनी तयार केलेल्या धोकादायक कफ सिरीपमुळे निष्पाप बळी गेले असून, मुलांच्या मृत्यूनंतर या कफ सिरीप कंपनीचं चेन्नई-बंगळूर महामार्गावर असलेलं दोन हजार चौरस फुटांचं उत्पादन युनिट सील करण्यात आलं आहे. तसंच कोडंबक्कम येथील नोंदणीकृत कार्यालयही बंद करण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणात आता पुढे काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.







