कोरबा: छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील एका आईस्क्रीम कारखान्यात राजस्थान येथील दोन कामगारांचा अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईस्क्रीम कारखान्याच्या मालकाने आणि त्याच्या सहकाऱ्याने कामगारांना विजेचे झटके दिले, त्यांना मारहाण करून नखे उपटल्याची हृदयद्रावक माहिती समोर आली आहे. अभिषेक भांभी आणि विनोद भांभी या कामगारांवर त्यांचा मालक छुटू गुर्जर आणि त्याचा सहकारी मुकेश शर्मा यांनी 14 एप्रिल रोजी चोरीचा गंभीर आरोप केला होता. चोरी केल्याच्या कारणामुळे कामगारांना अर्धनग्न करण्यात आले, विजेचे झटके देण्यात आले आणि त्यांचे नखे उपटण्यात आले होते. या घटनेचा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता. दरम्यान, अनेकांनी व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला होता. घटनेनंतर दोन्ही पीडित त्यांच्या मूळ गावी पळून गेले आणि भिलवाडा येथे पोहोचले. त्यांनी भिलवाडा येथील गुलाबपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नेमके प्रकरण:
कामगारांनी त्यांच्या मालकाकडे वाहनाचा हप्ता भरण्यासाठी ₹२०,००० रुपये मागितले होते. मालकाने पैसे न दिल्यामुळे नोकरी सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. याचा राग आल्याने मालकाने छळ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.