New Island In Japan Sea : नवी दिल्ली : एक -एक इंच जमिनीसाठी अनेक देशांमध्ये युद्ध होत असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र असे काही देश आहेत ज्यांना नैसर्गिक रित्या बेटांमार्फत जमिन मिळते. पॅसिफीक महासागराजवळील देशांमध्ये ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे बेटे तयार होत असतात. तीन आठवडय़ांपूर्वी जपानच्या समुद्रात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर एका छोटय़ा नव्या बेटाची तिथी निर्मिती झाली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे बेट फार काळ टिकणार नाही.
दक्षिणेकडील इवो जिमाच्या किनारपट्टीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या मालिकेला २१ ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली. त्यानंतर १० दिवसांत ज्वालामुखीची राख आणि खडक येथील उथळ समुद्रतळावर गोळा झाले. त्याचे टोक समुद्राच्या पृष्ठभागावर आहे. जपानच्या हवामानशास्त्र संस्थेच्या ज्वालामुखी विभागातील विश्लेषक युजी उसुई यांच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबरच्या सुरुवातीस सुमारे १०० मीटर व्यासाचे आणि समुद्रापासून २० मीटर उंचीचे नवीन बेट तयार झाले आहे.
इवो जिमाजवळ ज्वालामुखीची सक्रियता वाढली आहे. अलीकडच्या काही वर्षांत समुद्राखाली अनेक उद्रेक झाले आहेत. परंतु नवीन बेटाची निर्मिती ही एक महत्त्वाची घटना आहे, असे उसुई यांनी सांगितले. लाटांच्या माऱ्यामुळे नवीन बेट आता काहीसे आकुंचन पावत आहे. तज्ज्ञ येथील परिस्थितीचे विश्लेषण करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.