नाशिक: नाशिकच्या सिन्नरमधील ज्योतिषी अशोक खरात याच्यावर बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. या प्रकरणाचे पडसाद इतके उमटले की, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत महत्त्वाची आणि मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक खरात हा स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी म्हणवून घेत असे. मात्र, त्याच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाचे आणि फसवणुकीचे आरोप झाल्यानंतर त्याचे खरे रूप समोर आले. खरातला सध्या 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्या व्यक्तीवर महिलांच्या शोषणाचे आरोप आहेत, त्याच व्यक्तीसमोर नतमस्तक होणाऱ्या चाकणकरांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

या प्रकरणावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले कि, “माझे लोकही मला तिकडे जाण्याचा आग्रह करत होते, पण मी गेलो नाही. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांनी काही बंधने पाळली पाहिजेत. चाकणकर तिथे वारंवार जात असल्याने त्यांना कुणीतरी विश्वासात घेतले असावे, परंतु अंधश्रद्धेपासून दूर राहणे हेच माझे मत आहे.”

चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, घटनात्मक पदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चर्चेनंतर घेतला आहे. मात्र आता पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.







