नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासंदर्भात दिल्लीत मोठ्या हालचाली घडत आहेत. कारण महाराष्ट्राचे महायुतीतील महत्त्वाचे नेते शुक्रवारी दिल्लीत पोहोचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत बैठकीसाठी दाखल झाले आहेत.
शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची आज भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होत आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली. या बैठकीत कोणत्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला कोणत्या आणि किती जागा दिल्या जातील? याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.