नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये जनतेने महायुतीला कौल दिला आहे. आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्रिपद आणि सत्तावाटपाकडे लागलं आहे. कोणाच्या वाट्याला कोणतं मंत्रिपद येतं, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिपदांच्या वाटपासाठी काल(गुरुवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बैठकीसाठी बोलावले होते. या बैठकीत देवेंद्र फडणवीस, अजित पवारां आधी तर एकनाथ शिंदे नंतर पोहचले. या बैठकीत नेमकं काय ठरलं, याची माहिती महायुतीचे नेते शुक्रवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा आता दिल्लीत पोहोचला आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतपर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. दुसरीकडे एकनाथ शिंदे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी पोहोचले.
एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यातही बैठक झाली. यावेळी अमित शहा यांच्या निवासस्थानी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली. काही वेळानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे अमित शहा यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरु झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी महायुतीची तब्बल दीड तास बैठक चालली. दीड तासानंतर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, एकनाथ शिंदे बैठकीतून बाहेर निघाले. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
महायुतीत शिंदे गटाने त्यांचा विधीमंडळ पक्षाचा गटनेता निवडला आहे. तर अजित पवार गटानेही त्यांचा विधीमंडळ पक्षाचा गटनेत्याची निवड केली आहे. त्यानंतर आता भाजपला विधीमंडळ पक्षाच्या गटनेत्याची निवड करणे बाकी असून यासाठी भाजपसाठी पाऊले उचलल्याची माहिती मिळाली आहे. भाजपचे निरीक्षक लवकरच मुंबईत जाणार आहे. यासाठी भाजपकडून तीन निरीक्षकांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपच्या गटनेत्याची निवड केली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल? याबाबत अद्याप तरी सस्पेन्स कायम असल्याचं बघायला मिळत आहे.