रांची : झारखंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे एकमेव आमदार कमलेश कुमार सिंह यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. कमलेश कुमार हे झारखंडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षदेखील होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का आहे.
झारखंडमधील प्रदेश भाजप कार्यालयात आसामचे मुख्यमंत्री व राज्याचे निवडणूक सहप्रभारी हिंमत बिस्वा सरमा आणि प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनी कमलेश कुमार यांचे पक्षात स्वागत केले. कमलेश सिंह हे पलामू जिल्ह्यातील हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते यापूर्वी राज्य सरकारमध्ये मंत्रीदेखील होते. राज्यात आज भयाचे वातावरण असून, अशा स्थितीत भाजपच झारखंडच्या जनतेला स्थैर्य, शांतता, विकास देऊ शकतो, असा दावा कमलेश यांनी केला.
भाजप हा एक समुद्र आहे. इतर पक्ष या समुद्रापुढे तलावदेखील नाहीत. भाजपच्या नेतृत्वातच राज्याचा कायापालट होऊ शकतो, असेही ते म्हणाले. कमलेश कुमार भाजपमध्ये प्रवेश करणारे गत दीड महिन्यातील चौथे आमदार आहेत. यापूर्वी झारखंड मुक्ती मोर्चाचे चंपई सोरेन आणि लोबिन हेंब्रम यांनी कमळ हाती घेतले होते. चंपई सोरेन हे मुख्यमंत्री होते. याशिवाय अपक्ष आमदार अमित यादव यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला. झारखंड विधानसभेसाठी वर्षाअखेरीस निवडणूक होण्याची शक्यता आहे.