बदलापूर : बदलापूर येथे आदर्श शाळेमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. साडे ३ वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी बदलापूरकरांनी थेट स्टेशनमध्ये जात ठिय्या दिला होता. मंगळवारी सकाळपासून सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी संध्याकाळी मोडून काढले.
पोलिसांनी ट्रॅकवरून बाजूला होण्याची विनंती केली होती. मात्र ते काही बाजूला झाले नाहीत, शेवटी पोलिसांनी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लाठीचार्ज करत आंदोलकांना बाजूला काढलं. या प्रकरणी पीडित मुलींच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या एफआयआरचा तपशील समोर आला आहे.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या एफआयआरनुसार, ही घटना १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ वाजेदरम्यान घडली. या घटनेनंतर १६ ऑगस्ट रोजी मुलींनी शाळेत जाण्यास नकार दिला. तिच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार ती खूप घाबरली होती. प्राईव्हेट पार्टच्या ठिकाणी तिला त्रास होत असल्याने तिने घरी सांगितलं.
त्यानंतर घरच्यांनी तिला रुग्णालयात नेलं, त्यावेळी डॉक्टरांनी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. यावेळी कुटुंबीयांना धक्काच बसला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी १६ ऑगस्टलाच या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र, पोलिसांनी १२ तासांनंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला. यापूर्वी एका पालकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
एका पीडित मुलीने तिच्या कुटुंबीयांना सांगितले की, शाळेतील एका दादाने कपडे काढून प्रायव्हेट पार्टला हात लावला. दरम्यान, सफाई कामगार असलेला आरोपी अक्षय शिंदे याच्यावर पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमे लावत गुन्हा दाखल केला आहे. शाळा प्रशासन आणि पोलिसांना या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी एकत्र येत बदलापूर बंद ठेवण्याची घोषणा केली.
पीडित कुटूंबाची तब्बल १२ तास तक्रार नोंदवली नव्हती. मंगळवारी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत सर्वांना रेल्वे स्टेशनच्या पटरीवर ठिय्या आंदोलन केलं. यानंतर शासनाने कारवाई करत परिसरातील महिला निरीक्षक शुभदा शितोळे यांची बदली केली. तसेच शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि एका महिला कर्मचाऱ्याचे निलंबन केले. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.