लखनौ : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने न्यायालयीन अवमाननेप्रकरणी एका वकिलाला दोषी ठरवले. न्यायालयासमक्ष विना अंगरखा आणि शर्टचे बटण खुले ठेवून हजर झाल्याप्रकरणी अशोक पांडे नामक स्थानिक वकिलाला सहा महिन्यांची शिक्षा आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठविण्यात आला.
न्यायमूर्ती विवेक चौधरी आणि न्या. बी. आर. सिंग यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयात योग्य वर्तन न केल्यामुळे २०२१ साली वकील अशोक पांडे विरोधात अवमानना याचिका दाखल करण्यात आली होती. खंडपीठाने या प्रकरणात पांडेला ६ महिन्यांची शिक्षा आणि दोन हजारांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम महिनाभरात जमा न केल्यास एक महिना अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली आहे. पांडेला लखनौच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. शिक्षेसोबत पांडेला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालय आणि लखनौ खंडपीठासमोर वकिली करण्यापासून का रोखले जाऊ नये? अशी विचारणा नोटीसद्वारे करत १ मेपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पांडे १८ ऑगस्ट २०२१ रोजी कथितरीत्या अयोग्य पोशाखात न्यायालयात सादर झाला होता. तसेच न्यायाधीशांसोबत त्याने कथित दुर्व्यवहार केला होता. यानंतर न्यायालयाने स्वतः दखल घेत पांडे विरोधात अवमानतेची कारवाई सुरू केली होती. सुनावणीदरम्यान पांडे विरोधातील यापूर्वीच्या अवमानतेच्या कारवाईचा आढावा न्यायालयाने घेतला. २०१७ साली पांडेला उच्च न्यायालय परिसरात येण्यापासून दोन वर्षांसाठी मज्जाव करण्यात आला होता.