नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा जन्म १४ मे १९६० रोजी दिल्लीस्थित एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला. ते माजी न्यायाधीश देव राज खन्ना यांचे पुत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. एच. आर. खन्ना यांचे पुतणे आहेत. १८ जानेवारी २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळालेले न्यायमूर्ती संजीव खन्ना हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यापूर्वी तिसऱ्या पिढीतील वकील आहेत. प्रलंबित खटले निकाली काढून त्यांची संख्या कमी करणे व तत्काळ न्याय देण्यास त्यांनी प्राधान्य दिले. न्या. खन्ना यांची कायद्यावर जबरदस्त पकड आहे. यात घटनात्मक कायदा, प्रत्यक्ष कराधान, मध्यस्थता कायद्याचा समावेश आहे.
याशिवाय वाणिज्यिक, कंपनी, भूमी, पर्यावरण आणि वैद्यकीय निष्काळजीपणा या कायद्यांचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. १९८३ मध्ये बार कौन्सिल ऑफ दिल्लीमध्ये वकील म्हणून नावनोंदणी करण्यापूर्वी खन्ना यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून सेवा देताना ते अनेक ऐतिहासिक निकालांचा भाग राहिले आहेत.
ईव्हीएमची विश्वसनीयता कायम ठेवणे, ईव्हीएमची सुरक्षितता, बुथ कॅप्चरिंग आणि बोगस मतदान दूर करणे, जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय वैध ठरवणे, निवडणूक रोखे योजना गुंडाळणे आणि अबकारी धोरण प्रकरणात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याच्या निकालांवर खन्ना यांची छाप होती.