उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली होती. एका मुलीची हत्या करून तिचे काळीज बाहेर काढून खाणाऱ्या जोडप्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या घटनेत दाम्पत्याला मदत करणाऱ्या दोन आरोपींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वी 14 नोव्हेंबर 2020 रोजी, कानपूरच्या घाटमपूर पोलीस स्टेशन हद्दीतील भद्रस गावात ही घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं होतं.
दिवाळीच्या दिवशी ही निष्पाप पिडीत मुलगी गावातील दुकानात फटाके आणण्यासाठी गेली होती. तेथून ती अचानक बेपत्ता झाली आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह शेतात विकृत अवस्थेत आढळून आला. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी गावातील अंकुल कुरील आणि वीरन कुरील या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, जे काही समोर आलं ते ऐकून पोलीसही चक्राऊन गेले होते. त्यामुळे परिसरासह राज्यात मोठी खळबळ उडाली होती.
नेमकं प्रकरण काय?
पिडीत मुलीचे काका परशुराम आणि त्याच्या पत्नीनं मुलाच्या हव्यासापायी तांत्रिकांच्या सांगण्यावरून अंकुल आणि वीरन यांना पैसे देऊन मुलीची हत्या केली होती. एवढंच नाही तर त्यांनी मुलीचं काळीज देखील खाल्लं होतं, तांत्रिकाने त्यांना सांगितलं होतं की, जर तुम्ही मुलीच काळीज खाल्लं तरच तुम्हाला मुलगा होईल. धक्कादायक म्हणजे मुलीच्या हत्येपूर्वी अंकुल आणि वीरन यांनी दारू पिऊन निष्पाप चिमुरडीवर बलात्कार देखील केला होतं. यानंतर तिचे काळीज काढून परशुरामला देण्यात आलं होतं.
सध्या कानपूर देहात येथील न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होती. तीन वर्षे चाललेल्या सुनावणीनंतर शनिवारी न्यायालयाने आरोपी दाम्पत्य परशुराम आणि सुनैना यांना जन्मठेप आणि प्रत्येकी 20,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच अंकुल आणि त्याचा साथीदार वीरेन यांना जन्मठेप आणि प्रत्येकी 45 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.