नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या नोटिशीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिले आहे. अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सला उत्तर देताना सांगितले की, त्यांच्याकडे लपवण्यासारखे काही नाही आणि हे समन्स मागे ईडीने घेतले पाहिजे. वास्तविक, ईडीने दिल्ली दारू धोरण प्रकरणात हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली होती, ज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांना आज हजर राहण्यास सांगण्यात आले होते. पण, आता केजरीवाल यांनी आजही आपण ईडीसमोर हजर राहू शकत नसल्याचे म्हटले आहे. अरविंद केजरीवाल ईडीच्या समन्सवर हजर नसण्याची ही दुसरी वेळ आहे.
असे सांगण्यात येत आहे की, पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार अरविंद केजरीवाल हे बुधवारी विपश्यनेसाठी रवाना झाले, जिथे ते 30 डिसेंबरपर्यंत थांबतील. ईडीच्या समन्सला उत्तर देताना अरविंद केजरीवाल यांनी लिहिले, ‘मी प्रत्येक कायदेशीर समन्स स्वीकारण्यास तयार आहे. ते म्हणाले की, ईडीचे हे समन्सही पूर्वीच्या समन्सप्रमाणेच बेकायदेशीर आहे. ईडीचे समन्स राजकीय हेतूने प्रेरित आहेत, त्यामुळे समन्स मागे घेण्यात यावे. ते म्हणाले की मी माझे आयुष्य प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने जगलो आहे आणि माझ्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही.