Char Dham Yatra 2025: चार धाम यात्रा २०२५ साठी बनावट वेबसाइट्स, सोशल मीडिया पेजेस, पोस्ट आणि सर्च इंजिनवरील जाहिरातींद्वारे यात्रेसाठी बुकिंग करणाऱ्या लोकांची फसवणूक होत असल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. २८ एप्रिलपासून ऑफलाइन नोंदणी सुरु होणार असून 20 मार्चपासून आधारवर आधारित ऑनलाइन नोंदणी अनेकांनी केली आहे. नोंदणी केलेल्या 60 टक्के लोकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. 40 टक्के नोंदणी ऑफलाइन होणार आहे. फसवणुकीबद्दल केंद्र सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वी ऑनलाइन नोंदणीच्या नावावर अनेक भाविकांना लाखोचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
फसव्या पोर्टलवर केदारनाथसाठी हेलिकॉप्टर बुकिंग, चारधाम यात्रेकरूंसाठी गेस्ट हाऊस-हॉटेल बुकिंग, ऑनलाइन टॅक्सी आरक्षण, सुट्टीचे पॅकेज आणि धार्मिक पर्यटन इत्यादीचे आमिष दाखवून प्रवाशांची फसवणूक केली जात आहे. १.८ दशलक्षाहून अधिक यात्रेकरूंनी आधीच नोंदणी केली आहे. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने ऑनलाइन बुकिंग घोटाळ्यांबाबत अलर्ट जारी केला आहे.I 4C ने नमूद केले आहे की, हे घोटाळे विशेषतः धार्मिक प्रवासाच्या हंगामात, जसे की मे-जूनमधील चार धाम यात्रा किंवा इतर तीर्थक्षेत्रांच्या मोसमात होतात. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर फसवणुकीचा संशय असल्यास तक्रार नोंदवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.