आग्रा : ऐकावे ते नवलच अशी घटना समोर आली आहे. पती अंघोळ करत नाही या कारणावरून पत्नीने लग्नानंतर अवघ्या ४० दिवसात पोलीस स्टेशन गाठलं असल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, दोघांमध्ये अंघोळीवरून सतत वाद होत असत. शेवटी पत्नी माहेरी निघून गेली आणि त्यानंतर हे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये पोहचलं. पोलिसांनी हे प्रकरण समुपदेशकांकडे सोपवलं आहे. तिथे जेव्हा समुपदेशकांनी पत्नीची समस्या ऐकली तेव्हा त्यांनाही हा प्रकार अजब वाटला.
त्याबाबत अधिक माहिती अशी की, आग्र्यातील तरुणीचं लग्न ४० दिवसांपूर्वी एका तरुणासोबत झालं होतं. लग्नानंतर पत्नी जेव्हा पतीला अंघोळीसाठी जायला सांगायची तेव्हा तो टाळत असे. पत्नीने जबरदस्ती केली तर पतीने अंगावर गंगाजल शिंपडून घेतलं. हे सतत व्हायला लागल्याने पत्नीने सासरच्या मंडळींना हा सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी सासरच्या मंडळीनी जे सांगितलं त्यानंतर पत्नीने थेट आपलं माहेर गाठलं आहे.
पत्नीने माहेरी गेल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यात तिने म्हटलं आहे की, पती मारहाण करतो आणि हुंड्यासाठी छळ करतो. पती-पत्नीला समुपदेशकांनी बोलावलं तेव्हा पत्नीने मारहाणीसह अंघोळ न करण्याचा आरोपही पतीवर केला. ४० दिवसात पतीने फक्त सहा वेळा अंघोळ केली. घाणेरडा राहतो, अंघोळीचं सांगितलं तर मारहाण करतो. अंगावर गंगाजल शिंपडून घेतो आणि वेळ मिळाला तर अंघोळ करतो असंही पत्नीने तक्रारीमध्ये सांगितलं.
तसेच समुपदेशकांनी सांगितलं की, पती आणि पत्नीला बसून समाजवलं तेव्हा पत्नीने आगळी वेगळी अट ठेवली. पत्नीने म्हटलं की, जोपर्यंत पती दररोज अंघोळ करणार नाही तोपर्यंत त्याच्यासोबत राहणार नाही. पोलीस आणि समुपदेशकांसमोर पतीने लिहून द्यावं की तो दररोज अंघोळ करेन. आता दोघांनाही पुढची तारीख देण्यात आली असून पुन्हा त्यांचे समुपदेशन केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.