नवी दिल्ली : अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत युद्ध पातळीवर तयारी सुरु आहे. अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला रामजन्मभूमी मंदिर न्यास व विश्व हिंदू परिषदेने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले आहे.
देशभरातील व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कामांचे वाटप केले गेले आहे. त्यानुसार रामजन्मभूमी मंदिर न्यास व विश्व हिंदू परिषदेच्याकडे देशभरातील व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठवण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे, शरद पवार याशिवाय समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रित विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी सांगितले.
या सोहळ्यासाठी आम्ही सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रित दिले असून यामध्ये कोणालाही टाळलेले नाही. सर्वांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला यावे. यात राजकारण करू नये, असे अलोक कुमार यांनी म्हटले आहे.