नवी दिल्ली : नौदलाने सोमालियाच्या किनार्याजवळ अपहरण केलेल्या एमवी लीला नॉरफॉक जहाजावरील 15 भारतीयांसह सर्व 21 क्रू मेंबर्सची सुटका केली आहे. अपहरणानंतर लगेच भारतीय नौदलाने सोमालियाच्या किनाऱ्याजवळ कारवाई सुरू केली आणि चाच्यांना इशारा दिला. यानंतर कमांडोज नॉरफॉक जहाजावर उतरले तेव्हा दरोडेखोर पळून गेले.
दरम्यान, एका संरक्षण अधिकार्याचा हवाला देत वृत्तसंस्था एएनआयने सांगितले की, भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी अरबी समुद्रात भारतीय युद्धनौकांना चाच्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या भागातील व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी भारतीय नौदलाच्या चार युद्धनौका अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या आहेत.
भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोनी शुक्रवारी (५ जानेवारी) लायबेरियन ध्वजांकित व्यावसायिक जहाज एमवी लीला नॉरफॉकवर उतरून ऑपरेशन केले. नौदलाच्या आयएनएस चेन्नईमधून कमांडो नॉरफोक जहाजाजवळ आले होते. तसेच, नौदलाने अपहरणानंतर नॉरफॉकला शोधण्यासाठी सागरी गस्ती विमान P-8I आणि लांब पल्ल्याच्या ‘प्रीडेटर एमक्यू 9 बी ड्रोन’ तैनात केले होते.
प्रकरण कसे उघडकीस आले?
यूके मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) ने गुरुवारी (4 जानेवारी) एमव्ही लीला नॉरफॉक अपहरणाच्या घटनेची माहिती दिली होती. युकेएमटीओ धोरणात्मक जलमार्गांमधील जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवते.