पुणे : रेल्वे प्रवाश्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम जाहीर केले असून प्रवाशांना आता गाडी सुटण्याच्या केवळ 60 दिवस आधीच तिकीट आरक्षण करता येणार आहे. सध्या हा कालावधी 120 दिवसांचा होता, परंतु 1 नोव्हेंबर 2024 पासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करणे अधिक सुलभ होणार आहे.तसेच तिकीट रद्द होण्याच्या समस्या देखील कमी होतील, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तिकीट आरक्षणासाठी कमी कालावधी ठरवल्यामुळे तात्काळ प्रवासाचे नियोजन करणे सोपे होईल. तसेच, गाडी रद्द झाल्यास प्रवाशांना नको त्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. यासोबतच रेल्वेच्या आरक्षण यंत्रणेत बदल करून प्रवाशांच्या मागण्या ओळखून त्यानुसार तिकीट वितरणात सुधारणा केली जाईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत भारतीय रेल्वेने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा केली आहे. या अंतर्गत तिकीट आरक्षणानंतर त्वरित सीट उपलब्धता तपासण्यासाठी AI मॉडेल तयार करण्यात आले आहे.
यामुळे प्रवाशांना प्रतीक्षा यादीतून लवकर तिकीट मिळण्यास मदत होणार. 30% अधिक प्रवाशांना निश्चित तिकीट मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. रेल्वेच्या स्वयंपाकगृहांमध्ये देखील AI तंत्रज्ञान वापरले जात आहे, ज्यामुळे स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवली जात आहे. पुण्यातील पायलट प्रोजेक्टद्वारे धुतलेल्या चादरींची 100% पडताळणी करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांचे समाधानही झाले आहे.
तसेच विदेशी पर्यटकांसाठी 365 दिवसांच्या आरक्षण कालावधीमध्ये कोणताही बदल होणार नाही. काही विशेष गाड्यांसाठी जसे की ताज एक्सप्रेस, गोमती एक्सप्रेस, इत्यादीसाठी आधीपासून कमी कालावधीचा नियम लागू असलेल्या गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.