गुजरात : जुन्या नोटा आणि नाणी विकून लाखो रुपये कमावण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या एका शेतकऱ्याची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. गुजरातमधील वडोदरा येथील ४२ वर्षीय शेतकरी महेंद्रभाई यांना जुन्या पाच रुपयांच्या दोन नोटांच्या बदल्यात तब्बल ३४ लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवण्यात आले. मात्र, पैसे मिळण्याऐवजी तीन दिवसांत त्यांचे १ लाख ६ हजार ४०० रुपये गमावण्याची वेळ आली. सोशल मीडियावरील जाहिरातींच्या माध्यमातून नागरिकांना कसे जाळ्यात ओढले जाते, हे या घटनेतून समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या सुमारे १५ दिवस आधी महेंद्रभाई मोबाइलवर रील पाहत असताना त्यांना फेसबुकवर जुन्या पाच रुपयांच्या नोटेच्या बदल्यात १७ लाख रुपये देण्याची जाहिरात दिसली. त्यांच्याकडे अशा दोन नोटा असल्याने त्यांनी जाहिरातीतील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर व्हॉट्सॲपद्वारे दोन्ही नोटांचे फोटो संबंधित व्यक्तीला पाठवले.

६ ऑक्टोबर रोजी एका व्यक्तीने महेंद्रभाईंना फोन करून त्यांच्या नोटा घेण्यासाठी व्यक्ती पाठवली जाईल आणि त्याबदल्यात ३४ लाख रुपये असलेले पार्सल मिळेल, असे सांगितले. पार्सल पोहोचवण्यासाठी ७५० रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी मोबाइलवर मिळालेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसे पाठवले.

त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी फसवणूक करणाऱ्यांनी पार्सल घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला पकडल्याचे सांगितले. त्याच्या सुटकेसाठी २५ हजार ५०० रुपयांची मागणी करण्यात आली. मोठी रक्कम मिळण्याच्या आशेने शेतकऱ्याने पुन्हा पैसे भरले.
८ ऑक्टोबर रोजी पुन्हा फोन करून फसवणूक करणाऱ्यांनी त्यांच्या काही साथीदारांना अटक झाल्याचे सांगितले आणि ५३ हजार रुपये मागितले. लाखो रुपये मिळतील या अपेक्षेने महेंद्रभाईंनी पैसे पाठवणे सुरूच ठेवले. अशा प्रकारे ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान त्यांच्या एकूण १ लाख ६ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
जुन्या नोटा किंवा नाण्यांच्या बदल्यात लाखो रुपये देण्याचे आमिष दाखवणाऱ्या सोशल मीडियावरील जाहिरातींवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची खातरजमा करणे आवश्यक आहे. नोटा खरेदी, पार्सल वितरण किंवा शुल्क भरण्याच्या नावाखाली अनोळखी व्यक्तींना आगाऊ पैसे देऊ नयेत. तसेच, अनोळखी व्यक्तींनी पाठवलेले क्यूआर कोड वापरून पैसे पाठवण्यापूर्वी काळजी घ्यावी. थोड्या पैशांच्या बदल्यात मोठा आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या आश्वासनामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होऊ शकते.






