छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक कर्णपुरा यात्रेच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची पथके तैनात असताना एका तोतया महिला पोलिसाचा प्रकार उघडकीस आला आहे. खाकी वर्दी परिधान करून यात्रेत पोलिसांप्रमाणे फिरणाऱ्या २१ वर्षीय तरुणीला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. आपण नाशिक ग्रामीण पोलीस दलात भरती झालो असून यात्रेच्या बंदोबस्तासाठी आल्याचा दावा तिने केला होता. मात्र, अधिकृत ओळखपत्र आणि कागदपत्रे मागितल्यानंतर ती दाखवता न आल्याने तिचे बिंग फुटले. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्रपाली रमेश नरवाडे (वय २१, रा. जवखेडा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे संबंधित तरुणीचे नाव आहे. महिला पोलीस अंमलदार मीना नागनाथ जाधव यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छावणी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील मीना जाधव आणि त्यांचे सहकारी रविवारी दुपारी ३ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कर्णपुरा यात्रेत गस्त घालत होते. सायंकाळी आठच्या सुमारास मारुती मंदिराजवळ महिला पोलिसांच्या गणवेशात फिरणारी तरुणी त्यांच्या नजरेस पडली. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तिची चौकशी केली.

आपले नाव आम्रपाली नरवाडे असून, नाशिक ग्रामीण पोलीस दलातून बंदोबस्तासाठी आल्याचे तिने सांगितले. मात्र, भरतीसंदर्भातील ओळखपत्र किंवा अन्य अधिकृत कागदपत्रे मागितल्यावर ती दाखवू शकली नाही. तिच्या उत्तरांमध्येही विसंगती आढळल्याने पोलिसांनी पुढील कारवाई केली.
तपासादरम्यान, आम्रपालीने तीन वर्षांपूर्वी पोलीस प्रशिक्षण पूर्ण केल्याची माहिती कुटुंबीयांना दिल्याचा आरोप आहे. तसेच, नाशिक ग्रामीण पोलीस दलात भरती झाल्याचे आणि गेल्या तीन महिन्यांपासून प्रशिक्षण सुरू असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. यात्रेच्या बंदोबस्तासाठी आल्याचे भासवून तिने पोलीस असल्याचा आव आणल्याचा संशय आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमानुसार लोकसेवकाचा वेश धारण करण्यासंदर्भातील तरतुदींनुसार कारवाई केली जाते. पुढील तपास महिला पोलीस हवालदार गवळी करीत आहेत.






