यवत, ता. 12 : मैत्रिणीला भेटण्यासाठी मध्यरात्री तिच्या घराजवळ गेलेल्या 20 वर्षीय तरुणाला दुचाकीवरून जबरदस्तीने जनावरांच्या गोठ्यात नेऊन मारहाण केल्याची धक्कादायक घटना 10 ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली आहे. हि घटना यवत (ता. दौंड) येथील दोरगेवाडीत घडली आहे. या तरुणाला जातिवाचक शिवीगाळ करून लोखंडी कोयत्याचा धाक दाखविण्यात आला, तसेच लाकडी बांबूने मारहाण करून तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आली आहे.

यवत पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद दिगंबर दोरगे, मयूर लहुजी दोरगे, संकेत दोरगे, रोहित दत्तात्रय दोरगे, परशुराम रोहिदास दोरगे, ओंकार शिंदे आणि आदित्य दोरगे (सर्व रा. दोरगेवाडी, यवत) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बुद्धभूषण उत्तम गायकवाड (वय 20, रा. भीमनगर, यवत) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुद्धभूषण याची दोरगेवाडीत एक मैत्रीण आहे. त्या दोघांचे अधूनमधून फोनवर बोलणे होत होते. घटनेच्या रात्री सुमारे 12 वाजता मुलीचा बुद्धभूषणला इन्स्टाग्रामवर संदेश आला. त्यामध्ये भेटण्यासाठी बोलावल्याचे म्हटले होते. त्यानंतर तो रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तिच्या घराजवळील रस्त्याच्या बाजूला मित्राची दुचाकी घेऊन थांबला होता.

त्याचवेळी संकेत दोरगे आणि रोहित दोरगे तेथे आले. तो एवढ्या रात्री तिथे काय करीत आहे, अशी विचारणा त्यांनी केली. मैत्रिणीचा संदेश आल्याने भेटण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर दोघांनी त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून दोरगेवाडीतील प्रमोद दिगंबर दोरगे यांच्या जनावरांच्या गोठ्यावर नेले. तेथे अन्य काही जण आधीच उपस्थित होते.
गोठ्यावर पोहोचल्यानंतर संबंधितांनी त्याला जातीवाचक शब्द वापरून शिवीगाळ केली. परशुराम दोरगे याने शर्टची कॉलर पकडून त्याला गोठ्यात ओढत नेले आणि खाली बसवले. त्यानंतर ओंकार शिंदे याने नाकावर बुक्की मारली. मयूर दोरगे आणि परशुराम दोरगे यांच्या हातात लोखंडी कोयती होत्या. त्यांनी हालचाल किंवा आरडाओरडा केल्यास कोयत्याने मारण्याची धमकी दिली.
बुद्धभूषण खाली बसलेला असताना संकेत दोरगे आणि रोहित दोरगे यांनी लाकडी बांबूने त्याच्या पाठीवर मारहाण केली. त्यानंतर प्रमोद दोरगे याने बुद्धभूषणचा मोबाईल घेऊन शेजारी राहणाऱ्या अभिजित गोरख दोरगे यांना फोन केला. बुद्धभूषण त्यांच्या ताब्यात असून, त्याला घेऊन जाण्यासाठी गोठ्यावर यावे; अन्यथा त्याच्यासोबत काहीतरी केले जाईल, असे सांगितले.
दरम्यान, मारहाणीत वापरल्याचे सांगितलेली हत्यारे संबंधितांनी गोठ्याच्या आजूबाजूच्या अंधारात फेकून दिली. काही वेळाने अभिजित गोरख दोरगे आणि अभिजित बाळासो दोरगे हे त्याला घेण्यासाठी तेथे आले. त्यांच्याकडे बुद्धभूषणला सोपविण्यात आले. मात्र, घरी गेल्यानंतर मारहाणीबाबत कोणाला काही सांगितल्यास जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी आरोपींनी फिर्यादी यांना दिली होती.
भीतीपोटी रात्री गप्प; सकाळी वडिलांना सांगितला प्रकार
दोघांनी बुद्धभूषणला दुचाकीवरून त्याच्या स्वतःच्या मोटारसायकलजवळ आणून सोडले. त्यानंतर तो घरी गेला. रात्रीची वेळ असल्याने घडलेला प्रकार त्याने कुटुंबीयांना तत्काळ सांगितला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी त्याची नाराजी पाहून विचारपूस केली असता, त्याने संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर वडिलांसोबत तो यवत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला.
दरम्यान, पोलिसांनी त्याला वैद्यकीय उपचारांसाठी यवत ग्रामीण रुग्णालयात पाठविले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. ससून रुग्णालयात तपासणी व उपचार घेतल्यानंतर बुद्धभूषणने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
सात जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा
या प्रकरणी प्रमोद दिगंबर दोरगे, मयूर लहुजी दोरगे, संकेत दोरगे, रोहित दत्तात्रय दोरगे, परशुराम रोहिदास दोरगे, ओंकार शिंदे आणि आदित्य दोरगे (सर्व रा. दोरगेवाडी, यवत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह शस्त्र अधिनियम आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे.






