लोणी काळभोर, ता. १२ : कदमवाकवस्ती (ता.हवेली) येथील पालखीतळावर जलजीवन मिशन योजनेसाठी ठेवण्यात आलेल्या पाइपांना सोमवारी (ता. १२) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अवघ्या पाच मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठे नुकसान टळले.

मिळालेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती येथील पालखीतळावर जलजीवन मिशन योजनेच्या पाइपांचा साठा ठेवण्यात आला होता. सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास या पाइपांना अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक अवघ्या पंधरा मिनिटांच्या आत घटनास्थळी दाखल झाले.


अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या तत्परतेमुळे अवघ्या पाच मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे आग आणखी पसरून मोठे नुकसान होण्याचा धोका टळला.
या आगीत जलजीवन मिशन योजनेसाठी ठेवलेल्या पाइपांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.






