छ. संभाजीनगर : बिहारच्या कैमूर जिल्ह्यात घडलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या सामूहिक हत्याकांडात आता महाराष्ट्राचे कनेक्शन समोर आले आहे. सख्ख्या भावानेचमित्राच्या मदतीने मोठा भाऊ, वहिनी आणि दोन निष्पाप मुलांची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून दीपक राजपूत (27) आणि गौतम गुप्ता (22) या दोन आरोपींना अटक केली आहे.

हे हत्याकांड रामगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डहरक गावात घडले. मृत कृष्ण मुरारी हा घरात नेहमी वाद घालत असे. 5 मे रोजी त्याने आपल्या वृद्ध आईला मारहाण केली होती. आईने ही आपबिती महाराष्ट्रात राहणारा दुसरा मुलगा विकास गुप्ता याला फोन करून सांगितली. आईवरील अन्यायाचा बदला घेण्यासाठी विकासने त्याचा मित्र दीपक राजपूत याला सोबत घेतले आणि ते थेट बिहारला पोहोचले.

7 मे रोजी शेअर मार्केटच्या विषयावरून चर्चा करत असताना विकास आणि कृष्ण मुरारी यांच्यात वाद वाढला. रागाच्या भरात विकास आणि दीपकने कृष्ण मुरारीवर चाकूने सपासप वार केले. पतीचा ओरडण्याचा आवाज ऐकून वाचवण्यासाठी आलेल्या वहिनीला आणि त्यानंतर दोन्ही लहान मुलांनाही आरोपींनी जागेवरच संपवले.

यानंतर तिसरा लहान भाऊ राहुल उर्फ गौतम (जो दिव्यांग आहे) याने कुऱ्हाडीने चारही मृतदेहांचे तब्बल 18 तुकडे केले. धक्कादायक बाब म्हणजे, हा संपूर्ण रक्तपात आणि मृतदेहांची विल्हेवाट लावताना मृतकाची आई आणि दोन्ही भावजया घरात मूकप्रेक्षक बनून सर्व पाहत होत्या. पुरावे मिटवण्यासाठी त्यांनी घरातील रक्त धुवून फरशीवर सिमेंट लावले. आणि मृतदेह रामगढ-मोहनियां बॉर्डरवर दुर्गावती नदीत फेकून दिले.
10 आणि 12 मे रोजी नदी आणि कालव्यात सुटकेस व पोत्यांमध्ये छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह आढळून आले. शिर नसल्याने ओळख पटवणे अशक्य होते. परंतु, एका मुलाच्या कपड्यावर असलेल्या अंगणवाडीच्या शिलाई टॅगमुळे पोलिसांना धागादोरा मिळाला. यानंतर परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि मोबाईल लोकेशनवरून पोलिसांनी मुख्य आरोपी विकास गुप्ताला ताब्यात घेतले, ज्याने गुन्ह्याची कबुली दिली.







