पुणे: आखाती देशांमध्ये सध्या सुरू (Gold Rate) असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल, गॅस आणि इतर महत्त्वाच्या वस्तूंच्या किमतींमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. याचा थेट परिणाम म्हणून सोने आणि चांदीच्या दरांमध्येही मोठी वाढ आणि घसरण पाहायला मिळाली आहे.

युद्धाची घोषणा झाली, तसे सोन्याच्या दरांमध्ये एकाच दिवशी ७ ते ८ हजार रुपयांची मोठी वाढ पाहायला मिळाली. यामुळे सोन्याचा दर थेट १ लाख ६८ हजार रुपयांपर्यंत पोहोचला. चांदीच्या दरांमध्ये २ लाख ७० हजार रुपये किलोच्या आसपास असलेली चांदी काही दिवसांतच ३ लाखांच्या जवळपास पोहोचली.
दरम्यान, आता युद्धाच्या पहिल्या दिवशी मोठी वाढ झाल्यानंतर आता दरांमध्ये काही प्रमाणात घसरण झाली असून सराफा बाजारात सध्या स्थिरता आहे. मात्र, पुढील काळात आखाती देशांमध्ये युद्ध परिस्थिती कायम राहिली तर दर पुन्हा वाढण्याची दाट शक्यता आहे.
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ज्यांना सोने किंवा चांदी खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी सध्या चांगली संधी आहे. दरांमध्ये सध्या स्थिरता असल्याने खरेदी करणे सोयीचे ठरू शकते.







