Kolhapur : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आणि देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर येथील श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सध्या जतन आणि संवर्धनाची महत्त्वाची कामे सुरू आहेत. मंदिर विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत सुरू असलेल्या या कामांमुळे शनिवार 14 मार्च ते मंगळवार 17 मार्च 2026 या 4 दिवसांच्या कालावधीत देवीच्या गाभाऱ्यातील मूळ मूर्तीचे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

मात्र या काळात भाविकांना पूर्णपणे दर्शन बंद राहणार नाही. मंदिर प्रशासनाने उत्सवमूर्ती तसेच प्राणप्रतिष्ठापित मंगल श्रीकलशाची प्रतिष्ठापना पितळी उंबऱ्याबाहेर असलेल्या मुक्ती मंडपात केली आहे. त्यामुळे भाविकांना येथे देवीचे दर्शन घेता येणार असून अभिषेक सेवा आणि इतर धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
मंदिर विकास प्रकल्पांतर्गत गाभाऱ्याचे संरक्षण आणि मजबुतीकरण ही अत्यंत महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुरातत्व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरातील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री अंबाबाई आणि श्री महासरस्वती या 3 गर्भगृहांच्या अंतर्गत व बाह्य भागांची स्वच्छता, सॅण्ड ब्लास्टिंग, वॉशिंग आणि दगडी भिंती-फरशीचे जतन सुरू आहे. या प्रक्रियेमुळे शेकडो वर्षे जुन्या दगडी बांधकामातील भेगा आणि चिरा भरून काढून मंदिराची रचना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
याच टप्प्यात मुख्य पेटी चौकापासून गाभाऱ्यापर्यंत असलेल्या दगडी फरशीचे नूतनीकरण, दगडांची जोडणी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक बांधकामाची कामे केली जात आहेत. या कामांमुळे मंदिर परिसर अधिक सुरक्षित, सुबक आणि भाविकांसाठी सोयीस्कर करण्याचा उद्देश आहे.
मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार 17 मार्च रोजी आगमोक्त आणि वेदोक्त धार्मिक विधी तसेच पूर्णाहुती झाल्यानंतर दुपारी सुमारे 12:30 वाजता होणाऱ्या साडेबाराच्या आरतीपासून देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन पुन्हा सुरू होईल.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने भाविकांना या काही दिवसांत संयम राखून मंदिरातील संवर्धन कामांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मंदिराचा ऐतिहासिक वारसा जतन करताना भविष्यातील लाखो भाविकांसाठी सुरक्षित आणि सुबक व्यवस्था निर्माण करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.







