Sushil Kumar Modi Passes Away : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचं दीर्घ आजाराने निधन झाले आहे. 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुशील कुमार यांच्या निधनामुळे बिहारमधील भाजपचा चेहरा हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दिल्ली येथील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मागील सात महिन्यापासून कॅन्सरसोबत त्यांचा लढा सुरु होता. सुशीलकुमार मोदी आजारपणामुळे लोकसभा प्रचारावेळी उपस्थित नव्हते. त्यांनी याबाबत सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती.
बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी सुशील कुमार मोदी यांच्या निधनाबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते विजयकुमार सिन्हा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “भाजपचे वरिष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आपल्यात राहिले नाहीत.
संपूर्ण भाजप परिवारासह माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी ही मोठी हानी आहे. आपल्या संघटन कौशल्यासह प्रशासकीय समज आणि सामाजिक राजकीय विषयांवर आपल्या सखोल माहितीसाठी ते कायम लक्षात राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देओ तसेच या शोकप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना ताकद देवो”