नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) नेतृत्वाखाली दिल्ली-नोएडा सीमेवरून संसदेला घेराव घालण्यासाठी दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी सायंकाळी आपला मार्च स्थगित केला. आपल्या मागण्यांवर विचार करण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारला ७ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. तूर्तास आंदोलक शेतकरी नोएडास्थित दलित प्रेरणास्थळी मुक्कामी राहणार आहेत. एक आठवड्यात मागण्या मान्य झाल्या नाहीत. तर ‘दिल्ली मार्च’ सुरू करण्यात येईल, असा इशारा ‘एसकेएम’ने दिला आहे.
उत्तर प्रदेशातून दिल्लीकडे कूच सुरू केलेल्या शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडत दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. याचदरम्यान ग्रेटर नोएडा, नोएडा, यमुना प्राधिकरणाने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी एक आठवड्याचा वेळ मागितला. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर आठवडाभरात योग्य निर्णय घेण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्यातील प्रदीर्घ चर्चेनंतर शेतकऱ्यांनी आपला मार्च स्थगित करण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांसोबतच्या चर्चेत यमुना प्राधिकरणाचे ओएसडी शैलेंद्र सिंह, नोएडा प्राधिकरणाचे एसईओ महेंद्र प्रसाद आणि ग्रेटर नोएडा प्राधिकरणाचे ओएसडी उपस्थित होते. त्यांच्यासोबत पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीसुद्धा होते. दोघांमधील चर्चा फलदायी ठरली.
त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील एक आठवडा दलित प्रेरणास्थळी मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आहे; पण सर्वच प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य केल्या नाही, तर नव्या ताकदीने ‘दिल्ली मार्च’ काढला जाईल, असे शेतकऱ्यांनी ठणकावले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची यशस्वी मनधरणी झाली. त्यामुळे पोलिसांनी दिल्ली-नोएडा सीमेवरील दलित प्रेरणा स्थळाच्या गेट क्रमांक – ३ पुढील बॅरिकेड्स हटवले व हा मार्ग नागरिकांसाठी खुला केला. तत्पूर्वी, शेतकऱ्यांच्या मार्चमुळे नोएडातील रस्त्यांवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. अखेर शेतकऱ्यांनी माघार घेतल्यामुळे ही कोंडी गली व कारचालकांनी पुढील प्रवास सुरू केला.